नवी दिल्ली: सीपीआय नेते कन्हैया कुमारने नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. दोघांच्या या भेटीमुळे कन्हैया कुमार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की काय, आशा चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगत आहेत. दरम्यान, कधी आणि कोणत्या पदासाठी पक्षात आगमन करतील यासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी हे देखील काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने मेवानीला वडगाम मतदारसंघातून उमेदवारी न देता विधानसभा निवडणुकीत मदत केली होती.
कन्हैयाने मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि दोघांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा केल्याचे त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तसेच कन्हैयाच्या पक्षातून बाहेर पडण्यासंदर्भात विचारले असता, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा म्हणाले की, या महिन्याच्या सुरुवातीला ते आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार पक्षाला विश्वास आहे की कुमार आणि मेवाणी यांच्या प्रवेशामुळे नव्या दृष्टीने पक्षाला चालना मिळेल. कारण मागील दोन वर्षांपासून पक्षाला तरुण नेत्यांची अत्यंत गरज भासत असल्याचे चित्र दिसून येत आहे.