TOD Marathi

भारतीय शेअर बाजार शिखरावर; सेन्सेक्सने ओलांडला ६० हजारांचा टप्पा!

मुंबई: शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सेन्सेक्सने ६० हजारांची विक्रमी पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे ९ महिन्यांत १० हजार अंकांची वाढ झाली आहे. या आधी जानेवारी महिन्यात सेन्सेक्सने ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता. निफ्टीदेखील नवे विक्रम करत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. कोणत्याही क्षणी निफ्टी १८ हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांत भारतीय शेअर बाजारात सतत वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात मुख्यतः गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात विदेशी भांडवलाची आवक अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे. या व्यतिरिक्त, देशाच्या अर्थव्यवस्थेला लसीकरणाचाही लाभ मिळत असल्याचे दिसत आहे.

करोनाच्या प्रकरणामधील घट तसेच अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची कारणे आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील कंपन्यांचे आर्थिक परिणामही अपेक्षेपेक्षा चांगले दिसत आहेत. सध्या निफ्टी मिड कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये वाढ झाली आहे. निफ्टीच्या ५० पैकी ३८ शेअर्समध्ये नफा दिसून येत आहे.