TOD Marathi

राज्यसभा निवडणुकीचे निकाल (Rajyasabha Election Result) लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात या निकालांची चर्चा होत आहे. यामध्ये पहिल्या पाच जागांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे या उमेदवारांचा विजय झाला. या निवडणुकीत चुरस होती ती सहाव्या जागेसाठी ज्यामध्ये शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक हे उमेदवार होते. सुरुवातीपासून भाजप आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी आमचे सर्व उमेदवार जिंकून येतील अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त केला जात होता. राज्यसभा निवडणुकीच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागणही झाली होती. महाविकास आघाडीकडे आमदारांचे संख्याबळही आवश्‍यक तेवढं होतं, मात्र असं असतानाही महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) एक जागा कशी गमवावी लागली असा प्रश्न सर्वांनाच पडतो आहे.

महाविकास आघाडी मध्ये घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेची मतं फुटली नाही मात्र सोबत असलेल्या काही अपक्षांनी महाविकास आघाडीचा ‘गेम’ केला अशी चर्चा होती. त्याला आता पूर्णविराम मिळताना दिसतोय. विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना अपक्षांचे मतं आपल्याला किती मिळालीत आणि किती मिळू शकली नाहीत यावर भाष्य केलं, अर्थातच अपक्ष आमदारांची मतही महाविकास आघाडीला अपेक्षेप्रमाणे मिळाले नाहीत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर काही अपक्ष आमदारांच्या नावांचा थेट उल्लेख करत या अपक्ष आमदारांनी आम्हाला मदत केली नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा गेम हा ‘काही’ अपक्ष आमदारांनीच केला हे स्पष्ट आहे. (Independant MLAs Maharashtra)

कोरोनाची लागण झाली असताना प्रत्यक्ष बैठकांना देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहता आलं नसलं तरी त्यांनी त्याही काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, फोनद्वारे सर्वांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याचे काम सुरूच ठेवले होते. कुणाची नाराजी असेल त्या नाराजीचे मतपरिवर्तन करण्यात तसेच ज्यांची मत कुणाला द्यायची हे ठरली नसतील तिही मतं मिळवण्यात देवेंद्र फडणवीस यांनी केलेली खेळी यशस्वी झाली. महाविकास आघाडीला मात्र सर्व अ पक्षांना सोबत घेता आलं नाही आणि भाजपच्या तिसऱ्या जागेचाही मार्ग सुकर झाला.