TOD Marathi

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर वाढतच आहेत त्यात आता नैसर्गिक वायूच्या किंमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार, नैसर्गिक वायूच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.

नैसर्गिक वायू सीएनजी इंधन बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे त्याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबर म्हणजेच आजपासूनच पुढच्या ६ महिन्यांसाठी ही दरवाढ लागू होणार आहे. नैसर्गिक वायूचं उत्पादन करणाऱ्या ओएनजीसीसारख्या कंपन्यांमध्ये ही दरवाढ तातडीने लागू करण्यात आली आहे.

या दरवाढीमुळे सीएनजी आणि पाईपने पुरवल्या जाणाऱ्या घरगुती गॅसच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांना मात्र पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.