TOD Marathi

मुंबई: देशातील केंद्र सरकार अर्थातच मोदी सरकारने देशातील लोकशाहीचा खेळखंडोबा केला असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मधून केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे. तसेच भ्रष्टाचार नक्की करतोय कोण व धाडी कुणावर पडताहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

संजय राऊत म्हणाले आहेत की, दिल्लीतील विद्यमान सरकारने देशातील लोकशाहीचा भयानक खेळखंडोबा केला आहे. या खेळखंडोब्यातून महाराष्ट्राची तरी सुटका व्हावी. भ्रष्टाचार नक्की करतोय कोण व धाडी कुणावर पडताहेत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पीएम केअर्स फंडाचा हिशोब कोणी द्यायला तयार नाही. पीएम केअर्स फंड हा सरकारी नसून खासगी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे व सरकारातले अनेक ‘वाझे’ या पीएम केअर्स फंडात पैसे जमा करावेत म्हणून उद्योगपती, व्यापऱ्यांना सूचना देत होते, असेही ते यावेळी म्हणाले.

न्यायालयातही ‘आपली’ माणसे घुसविण्याचा प्रयत्न सुरू असला तरी या देशातील हायकोर्टात आजही सत्य पूर्ण मेलेले नाही व सुप्रीम कोर्ट बरखास्त झालेले नाही हे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांनी विसरू नये, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.