TOD Marathi

रायगड:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ६ जूनला किल्ले रायगडावर मोठी वर्दळ असेल. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांकडून शिवप्रेमींसाठी खास सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून यासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आला असून त्यामध्ये वाहतूक व्यवस्था आणि किल्ले रायगडाकडे (Raigad Fort) येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था कुठे आणि कशी असेल, याची माहिती देण्यात आली आहे. (shivrajyabhishek sohala 2022 on Raigad fort)

पोलिसांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला मार्ग हा सातारा-कोल्हापूरकडून येणार आहे. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड मार्गे स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोंझर-१ आणि कोंझर २ इथे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, वाळसुरे १ येथेही पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. याठिकाणी वाहने पार्क करून शिवप्रेमींना एसटीच्या शटल सेवेने रायगडाच्या दिशेने जाता येईल. कोंझर ३ ते पाचाड अशी एसटीची शटल सेवा सुरु राहील. एसटीने पाचाडपर्यंत पोहोचल्यानंतर शिवप्रेमींना किल्ले रायगडापर्यंतचा प्रवास पायीच करावा लागेल. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली रोप वे सेवा राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सुरु असेल.

दुसरा मार्ग हा मुंबईहून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आहे. मुंबई, माणगाव, दालघर फाटा, कवळीचा मार्ग आणि सोनजई मंदिर असा हा प्रवास असेल. मुंबईकडून येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांसाठी सोनजई मंदिराच्या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. तर पुणे, ताम्हणी घाट, निजामपूर आणि सोनजई मंदिर असा प्रवास करत येणाऱ्या शिवभक्तांसाठीही याच ठिकाणी पार्किंगची सोय असेल. कवळीचा मार्ग आणि सोनजई येथून एसटीची शटल सेवा सुरु असेल. एसटीने शिवभक्तांना पाचाडपर्यंत सोडले जाईल. पार्किंग केलेली सर्व वाहने सुरक्षित राहतील, याची हमी पोलिसांकडून देण्यात आली आहे.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी नातेखिंड ते किल्ले रायगड आणि सोनजई मंदिर ते किल्ले रायगड हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.