TOD Marathi

दसरा मेळाव्याचं राजकारण संपत नाही तोच महाराष्ट्रातील राजकारण आणखी नव्या वळणावर पोहोचलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाच्या कक्षेत आली. (Hearing of Maharashtra Political Crisis in EC) पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण यावर दोन्ही बाजूंच्या वतीने दावा करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने केलेल्या अर्जात आपल्याला धनुष्यबाण चिन्ह देण्याची मागणी करण्यात आली आहे, उद्धव ठाकरे गटाला आमदारांचा पाठिंबा नाही असा दावाही त्यांनी केला आहे. निवडणूक चिन्हावरील याचिकेवर तातडीने सुनावणी करून हा मुद्दा निकाली काढण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासाठी (Shivsena party election symbol) ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या लढतीत 7 ऑक्टोबर हा दिवस महत्त्वाचा असणार आहे.
एकतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र करण्यास सांगितले आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आहे. त्यामुळे या सुनावणीला खुप महत्त्व आहे.

3 ऑक्टोबरला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East bye election) मतदान होणार आहे तर या निवडणुकीचे निकाल 6 नोव्हेंबरला लागणार आहे. थोड्याच वेळात निवडणूक आयोगात ही सुनावणी होणार आहे. यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि वकिलांचे टीम दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगातील या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला तरी दिलं जाणार की ते गोठवले जाणार? याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांनी कागदपत्र सादर करण्यासाठी आजची शेवटची मुदत आहे. शिवसेना ही मुदत वाढवून मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

यापूर्वीही शिंदे गटाने जुलैमध्ये शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला होता. आयोगाला लिहिलेल्या पत्रात आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावाही शिंदे गटाने केला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या मान्यतेचा दाखला देखील दिला होता.

नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही बाजूंच्या वतीने शिवसेना पक्षाचे चिन्ह वापरण्यात आलं होतं. वेगवेगळ्या वेळी आपणच खरी शिवसेना आहोत असा दाखवण्याचाही प्रयत्न दोन्ही गटाकडून नेहमीच केला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आज काय सुनावणी देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगाने जर चिन्ह गोठवलं तर काय करणार? याची चाचपणी देखील दोन्ही गटांनी केली गेली असण्याची शक्यता आहे.