अहमदाबाद :
गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते आणि पूर्वीचे काँग्रेस नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस (Congress) पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनंतर ते कुठे जाणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. हार्दिक पटेल यांचा 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता हार्दिक पटेल भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
In poll booster, Hardik Patel set to join BJP
Read @ANI Story | https://t.co/8xu1siJndL#HardikPatel #bharatiyajanataparty #gujaratelections pic.twitter.com/voo9624iub
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2022
दरम्यान, पक्षातून राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने हार्दिक यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या आरोपानुसार पटेल मागील 6 वर्षांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी हार्दिकच्या राजीनाम्यामागे भाजपचा हात असल्याचा देखील आरोप केला आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर आता हार्दिक पटेल 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.
हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना प्रदेश कार्याध्यक्ष पदी निमणुक दिली होती. मात्र त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला. राजीनामा देत असताना त्यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर बोटही ठेवलं होतं. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या 2 जून रोजी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हार्दीक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश करणं हा भाजपचा मोठा विजय मानला जात आहेत.