सिनेसृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकाराला दरवर्षी मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच दिल्ली येथे संपन्न झाला असून या वेळी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला (Goshta Eka Paithanichi) मिळाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिग्दर्शक शंतनू रोडे (Shantanu Rode) आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांना प्रदान करण्यात आला.
६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या खास दिनाचे औचित्य साधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
स्वप्नाचा नक्षीदार प्रवास घडवणाऱ्या या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजीं, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.