TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2021 – देशातील सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांनाही फॅमिली पेन्शन ही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे फॅमिली पेन्शन दिली जाणार आहे. आता किमान फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा झाल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत बँक कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनला किमान आणि कमाल रकमेची मर्यादा काढून टाकलीय. यामुळे बँक कर्मचाऱ्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. बँक कर्मचारी बऱ्याच काळापासून पेन्शन सुधारणेची मागणी करत होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वार्षिक कामगिरी आढावा बैठकीत हा निर्णय घेतला. यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 12 बँकांचे प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अर्थात एनपीएसचे संरक्षण नसलेल्या बँक कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2021 पासून प्रभावाने केली जाणार आहे.

आता नवीन निर्णयानुसार, या पुढे बँक कर्मचाऱ्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 30 टक्के फॅमिली पेन्शन मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुमारे 1.25 लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यासह राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दिलेले योगदान आता 10 टक्क्यांवरून 14 टक्के केले आहे. यामुळे त्यांच्या पेन्शन फंडामध्ये भर पडणार आहे.

यापूर्वी बँक युनियन आणि बँक व्यवस्थापन यांच्यातील 10 व्या वेतन करारानुसार बँक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला किमान 2785 रुपये आणि कमाल 9284 रुपये पेन्शन मिळत होते, तर 11व्या करारानुसार किमान रक्कम 3,985 आणि कमाल रक्कम 13,280 रुपये इतकी होती. आता मात्र कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराच्या मूळ वेतनाच्या 30 टक्के दराने फॅमिली पेन्शन उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे त्यावर महागाई भत्ताही मिळणार आहे. यामुळे फॅमिली पेन्शनमध्ये भरघोस वाढ होणार आहे.