TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 सप्टेंबर 2021 – गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत अर्थात टोल माफी दिली जात आहे, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्यात.

आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अपर पोलीस महासंचालक (महामार्ग वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे आवश्यक आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करताना या वाहनांसाठी स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलेत.

मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करून गणेश भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूककोंडी कमी होईल.

सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.

पथकर नाक्यांवर गणेशभक्तांशी वाद घालू नका, पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करून देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्यात.