TOD Marathi

मुंबई: नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. मी पाठवलेल्या पत्राकडं एनसीबीनं दुर्लक्ष करणं चुकीचं असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी क्रुझवर होता, मात्र त्याला पकडण्यात आले नाही कारण तो समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचा आरोप केलाय.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया दाढीवाला हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही मागवावी. त्यात त्या ड्रग्स माफियची गर्लफ्रेंड बंदूक घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ देखील आहे, असं मलिक म्हणाले आहेत. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल असं नवाब मलिक म्हणाले. समीर वानखेडे यांच्या मालदीव दौऱ्याची चौकशी व्हावी, असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय.

एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाठवलेले निनावी पत्राची दखल घेण्यात यावी अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली आहे. एवढी मोठी तपास यंत्रणा, आमच्या पेक्षा चार पावलं पुढे असेल असं वाटलं होतं, मात्र तसं नाहीये, अशी टीका देखील मलिक यांनी केली आहे.