TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, 31 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी चांदिवाल समिती करत आहे. मात्र, परमबीर सिंह चौकशी आयोगासमोर सातत्याने गैरहजर राहिलेत. त्यामुळे आयोगाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय, आयोगाने परमबीर सिंह ७ सप्टेंबरला गैरहजर राहिले तर त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात येईल, अशी तंबी दिलीय.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुल करण्याचे आदेश दिल्याचे आरोप केलेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. यानंतर राज्य सरकारने हि या आरोपांची समांतर चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत सुरु केलीय.

या आयोगाने परमबीर यांना आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. मात्र, परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर न करता चौकशीला सातत्याने गैरहजर राहिलेत. यामुळे आयोगाने परमबीर यांना जून महिन्यामध्ये ५ हजारांचा, १९ ऑगस्टला २५ हजाराचा व २५ ऑगस्टला पुन्हा २५ हजाराचा दंड ठोठावला.

दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश देऊन ३० ऑगस्टला सुनावणी निश्‍चित केली होती. मात्र, या सुनावणीलाही परमबीर सिंह गैरहजर राहिल्याने आयोगानं संताप व्यक्त केला. तसेच पुढील सुनावणीला परमबीर सिंह जर गैरहजर राहिल्यास वॉरंट जारी केलं जाईल, अशी तंबी देत आयोगाने सुनावणी ७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केलीय.