TOD Marathi

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. (Devendra Fadnavis met Raj Thackeray at Shivtirth) राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी देवेंद्र फडणवीस भेटीला आले होते. गेले काही दिवस या ‘राज’भेटीची चर्चा होती. अखेर शुक्रवारी सकाळी फडणवीसांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीसांचे औक्षण केले. दरम्यान फडणवीसांना ओवाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. फोटो काढताना झालेल्या एका गमतीमुळे फडणवीस आणि शर्मिला ठाकरे यांना हसू आवरलं नाही.

‘दोन वेळा काही खाऊ शकता का तुम्ही?’ असा प्रश्न शर्मिला ठाकरेंनी ओवाळताना फडणवीसांना विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, की ‘हो अगदीच’. नंतर शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण केले. त्यानंतर त्यांनी फडणवीसांना गोडाचा घास दिला, तोही त्यांनी खाल्ला. पुढे ओवाळणीचं ताट ठेवण्यासाठी शर्मिला ठाकरे वळत होत्या, इतक्यात कोणीतरी त्यांना फोटोसाठी पोझ देण्यासाठी थांबण्यास सांगितलं. त्यामुळे त्या ‘सॉरी’ म्हणत थांबल्या. मात्र त्यांना दिवा आपल्याकडे असल्याचं लक्षात येताच त्यांनी औक्षणाची थाळी फिरवली. या गडबडीमुळे शर्मिला ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि बाजूला उभ्या असलेल्या राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही हसू काही आवरलं नाही.

राज ठाकरेंनी नव्या सरकारला दिलेल्या शुभेच्छा, त्यापूर्वी त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका यामुळे ते भाजपच्या बाजूने झुकल्याची चर्चा होतीच. अशातच नव्या सरकारमध्ये अमित ठाकरे यांच्या रूपाने मनसेला मंत्रीपद मिळेल अशाही चर्चा होत्या, ज्या पुढे नाकारण्यात आल्या. अशातच आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळात अमित ठाकरेंचा (Amit Thackeray) समावेश केला जाईल ही बातमी खोटी होती असे एका वाक्यात सांगत राज ठाकरे यांनी तो विषय संपवला. गेल्या काही दिवसापासून मनसे आणि भाजपमधील जवळीक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा, विधानपरिषद, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेने भाजपला साथ दिली होती. (MNS supported BJP in last some activities) त्यासाठी फडणवीस यांनी विधानसभेत राज ठाकरे यांचे जाहीर आभार मानले होते. तसेच आपण लवकरच त्यांची भेट घेऊन व्यक्तिशः आभार मानू, असेही म्हटले होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस बुधवारी राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार होते. मात्र ती पुढे ढकलली गेली.