TOD Marathi

टिओडी मराठी, बीड, दि. 18 जून 2021 – कोरोना काळात आम्हाला ३ महिन्यासाठी कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र, कालावधी पूर्ण होण्याअगोदर आम्हाला नोकरीवरुन काढून टाकले, असा आरोप करत आंदोलक आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे बीडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचा ताफा आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत नवीन करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट झालीय. मात्र, बीडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढताना पाहायला मिळतेय. मागच्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत.

गुरुवारी, दि.17 रोजी बीड जिल्ह्यात सुमारे सव्वा दोनशे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आणि राजेश टोपे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन ते उस्मानाबादकडे निघाले असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी हे अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अचानक आंदोलक मोटारसमोर आले.

अचानक मोटारसमोर आलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली. यावेळी आंदोलकांना मोटारच्या बाजूला हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.