TOD Marathi

नवी दिल्ली: दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळच्या एका ३ मजली व्यवसाईक इमारतीला काल आग लागली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २७ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. जखमींपैकी १० जण गंभीर असून १९ जण अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा इमारतीचे मालकांना ताब्यात घेतले आहे.

मेट्रो स्टेशनच्या जवळ असलेल्या इमारतीत दुपारी ५ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ८ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. पण रात्री १२ नंतर पुन्हा आग पेटली, त्यामुळे अग्निशमन दलाने त्यावर नियंत्रण मिळवले. बचाव पथकाने इमारतीच्या खिडक्या तोडून अडकलेल्या लोकांना वाचवले. रात्री एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी पोहोचली होती.

ज्या इमारतीमध्ये आग लागली होती तेथे अनेक कंपन्यांचे कार्यलय होती. आग लागल्यानंतर जवळपास १५० जणांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालायत दाखल करता येईल यासाठी पोलिसांनी घटनास्थळापासून संजय गांधी मेमोरियल रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. दिल्लीचे डीसीपी समीर शर्मा यांनी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जे मृतदेह सापडले आहेत त्यावरून त्यांची ओळख पटवणे अशक्य आहे.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही तयार करण्याची फॅक्ट्री आणि गोदाम आहे, तिथे महिला कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक असल्याची माहिती आहे. तेथे शॉर्ट सर्किट लागल्याने आगीने भीषण रुप घेतले. संबंधित इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देखील मिळाली नव्हती. इमारतीतून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता. आपातकालीन मार्ग देखील नसल्याने बचावकार्य लवकर सुरू करता आले नाही.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.