TOD Marathi

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने माघ शुद्ध चतुर्थीला विनायक अवतार असलेला गणेश जन्म सोहळ्याचे बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजन करण्यात आले होते. मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात दुपारी १२ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशजन्म सोहळा संपन्न झाला. बाळा जो जो रे… च्या मंगल स्वरांत पाळणा गात महिलांनी श्रीगणेशाचरणी प्रार्थना केली.

गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराची विविधरंगी फुलांनी सजावट गेली गेली होती. गणेश जन्म सोहळ्याच्या या मंगल प्रसंगी संपूर्ण दगडूशेठचा परिसर भक्तिमय झाल्याचे दिसून येत होते. गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेऊन सोबतच गणेश चरणी आरोग्यसंपन्न भारताची प्रार्थना केली.

शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडल्या नंतर पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रख्यात गायक अवधूत गांधी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. स्वराभिषेकातून हरिनामाचा गजर, अभंग, भजन, गोंधळातील गण, शाहिरी गण, गोंधळ, गवळण, जुगलबंदी आणि भैरवी या विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना या शुभ प्रसंगी मिळाली.
नगरप्रदक्षिणा सायंकाळी ६.३० वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरापर्यंत चांदीच्या पालखीतून काढण्यात येणार असून रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल.