टिओडी मराठी, मडगाव, दि. 16 मे 2021 – मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर आता चक्रीवादळमध्ये झाले आहे. चक्रीवादळाचा फटका गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसतोय. काल कोकणासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. तर बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्यात. अरबी समुद्रातील वादळामुळे किनारपट्टीवर येणाऱ्या सोसाट्याने वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे एक्सप्रेस ट्रेनवर झाड कोसळले आहे. यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.
आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जाताना या ट्रेनला अपघात झाला. एक मोठं ट्रेनवर कोसळल्याने रुळावर ट्रेन थांबली. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या लोहमार्गावर कोसळलेल्या झाडाला हटवण्याच काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेसेवा लवकरच सुरळीत केली जाईल, असे कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
लोहमार्गावर झाड कोसळल्याने कोकण रेल्वेविभागातील थिवीम ते मडगाव दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली. याचा परिणाम या मार्गावर प्रवास करणाऱ्या इतरही रेल्वेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील काही ट्रेन उशीरा धावतील, असा अंदाज आहे.
सध्या कोकणातील वातावरण झपाट्याने बदलत आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच अरबी समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात गारवा निर्माण झालाय.