Gujarat-Himachal Election Results 2022 : गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat-Himachal) या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस खुप महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (Assembly Election Results) पार पडत आहे. या दोन्ही राज्यात सत्तेची सुत्र कोणाच्या हातात जाणार ते आज स्पष्ट होणार आहे. या निकालाकडं या दोन्ही राज्यांसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती यायला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचं सरकार आहे. त्यामुळं या दोन्ही राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक त्यांच्याकडून सत्ता खेचणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. गुजरातमधील 37 केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 182 सदस्यीय राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा 92 आहे. गुजरातमध्ये एकूण 64.33 टक्के मतदान झाले आहे तर हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 68 जागांसाठी झालेल्या मतदानात 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते (The majority figure for the 182-member state Gujarat Legislative Assembly is 92. Gujarat recorded a total of 64.33 percent voting, while Himachal Pradesh polled over 75 percent in a single phase on November 12 for 68 seats). या दोन्ही राज्यात कोण सत्तेत येणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनीष गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात 59 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 68 केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएमवरून मतमोजणी होईल. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात आहेत.
गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. गुजरातमध्ये भाजपची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी 2002 मध्ये होती. त्यावेळी भाजपनं 182 सदस्यांच्या विधानसभेत 127 जागा जिंकल्या होत्या. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होत असली तरी यावेळी आम आदमी पक्ष निवडणूक लढवली आहे. त्यामुळं गुजरातमध्ये तिरंगी सामना झाला आहे. भाजप आणि काँग्रेससह आप किती जागा मिळवणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.