TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 25 ऑगस्ट 2021 – रंजन कोळंबे यांनी लिहलेल्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा बेकायदेशीरपणे प्रती छापून त्या विक्री केल्या जात असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. याप्रकरणी आज नांदेडमधील विविध दुकानांवर कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या परिघात प्रसिद्ध असलेल्या भगीरथ प्रकाशनाच्या रंजन कोळंबे यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांच्या बनाबट प्रती छापून राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे विकल्या जात आहेत, अशा अनेक घटना अनेक वर्षांपासून निदर्शनात येत आहेत.

त्यात पाटील बुक सेंटर, नवीन मोंढा, नांदेड (मालक: नितीन मारोती घोडके) आणि टारगेट बुक सेंटर, नवीन मोंढा, नांदेड (मालक: महेश विष्णू संगेवार)
यांकडून बनावट पुस्तकांचा मोठा साठा जप्त केला आहे. तसेच त्यांच्यावर कॉपीराईट कायदा, १९५७ च्या कलम ६३ नुसार, तसेच भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ४२०, ४६८, ४७१, ४८९ या कलमांनुसार कारवाई केली जात आहे.

ही कारवाई नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे सर (आयपीएस) यांच्या निर्देशानुसार तसेच पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख सर (डीवायएसपी) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत रोडे आणि त्यांच्या टिममधील पोलीस नाईक ढवळे आणि इतरांनी केली आहे. नांदेड शहरातील इतरही पुस्तक विक्रेत्यांमार्फत अशी बनावट पुस्तके नियमितपणे विकली जात आहेत, अशी माहिती विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेली आहे.

स्पर्धा परीक्षेच्या इतरही प्रसिद्ध पुस्तकांच्या बनावट विक्री राजरोसपणे या व्यक्तींकडून केली जात आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. ही बनावट पुस्तके कोठे छापली जातात? आणि त्यांचे वितरक कोण आहेत?, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत भगीरथ प्रकाशनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्याचदा ही बनावट पुस्तके जुन्या आवृत्तीची असतात. त्यात अनेक पाने गायब असतात, चुकीची माहिती/आकडेवारी असते, छपाई आणि पाने निकृष्ठ दर्जेची असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे विद्यार्थ्यानी पुस्तके घेतांना ती बनावट नसल्याची खात्री करूनच घ्यावी. तसेच पुस्तकांची पोच घ्यावी, असे आवाहन देखील भगीरथ प्रकाशनने केले आहे.