टिओडी मराठी, पुणे, दि. 26 जून 2021 – करोनामुळे अनेकांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. यात काहींचे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. अशा
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. हा निर्णय विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतला.
त्यामुळे पुणे, नगर आणि नाशिक कार्यक्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलासा मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती आहे?, त्याची माहिती संकलित केली जात आहे.
विद्यापीठाची शनिवारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच विषयावर वेळेअभावी निर्णय होऊ शकले नाहीत. त्यामुळे पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये परिषदेची बैठक होणार आहे.
तत्पूर्वी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी करोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव बैठकीत मान्य केला आहे. त्यामुळे करोनामुळे मृत पावलेल्या आई-वडिलांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे.
या दरम्यान, सध्या विद्यापीठाच्या द्वितीय सत्राची परीक्षेचे नियोजन सुरू झाले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी शुल्कासह अर्ज करीत आहेत. परीक्षा अर्ज भरण्याची मुदत दि. 27 जूनपर्यंत आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेत.
काही विद्यार्थी अर्ज करीत आहेत. अशा स्थितीत करोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. ज्यांनी शुल्क भरले असतील, त्यांना परीक्षा शुल्क परत दिले जाणार आहे, असाही निर्णय बैठकीत घेतला आहे.