टिओडी मराठी, औरंगाबाद, दि. 5 सप्टेंबर 2021 – भाजप आणि शिवसेना यांची युती तुटल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. औरंगाबाद येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कोरोनाची तिसरी लाट येणार का नाही? हे मला माहित नाही. कोरोना केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो. तो माझ्याशी बोलत नाही. मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडरही नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर पाठीमध्ये खंजीर खुपसल्याची टीका केली होती. यावर बोलताना, आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर समोरुन कोथळाच बाहेर काढतो. बाळासाहेबांची ही शिकवणं नाही तसेच पाठीत खंजीर खुपसण्याची शिवसेनेची परंपराही नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत यांनी टीका केल्यावर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘हम किसीको टोकेंगे नही अगर किसी ने टोका तो छोडेंगे नही’, असा प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणेंनी जेव्हा वक्तव्य केलं तेव्हा त्यांना अटक केली आता संजय राऊत यांच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.