टिओडी मराठी, मुंबई, दि. 18 ऑगस्ट 2021 – मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 2020 मधील पोर्नोग्राफी प्रकरणामधील उद्योगपती राज कुंद्राला उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात राज कुंद्राला आठवड्याभरासाठी अटकेपासून संरक्षण दिले आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने दाखल केलेल्या प्रकरणामध्ये राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे.
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या प्रकरणातील अन्य आरोपी शार्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांच्यासह अन्य आरोपींनाही न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे. पोर्नोग्राफीच्या अन्य एका प्रकरणामध्ये आपल्याला याच कलामांतर्गत अटक केली आहे.
तसेच या तपासदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रेही जप्त केली आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्याची गरजेचे नसल्याचे कुंद्राच्यावतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकिल प्राजक्ता शिंदे यांनी त्याला विरोध केला आहे.
यात राज कुंद्राची भूमिका इतर आरोपींपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तो समानतेच्या आधारावर संरक्षण मागू शकत नाही, असा दावा करत राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. त्याची दखल घेत यात राज कुंद्राला आठवड्याभरासाठी उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच याची सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.