राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोघेही आज पुण्यात आहेत. (CM Eknath Shinde and Aaditya Thackeray in Pune) विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळच्या सुमारास आदित्य ठाकरेंची कात्रज परिसरात सभा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच दिवशी, एकाच शहरात, एकाच ठिकाणी, एकाच वेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे असणार आहेत. संध्याकाळी कात्रज परिसरात तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट आहे तर कात्रज परिसरातच आदित्य ठाकरे त्याच सुमारास सभा घेणार आहेत.
साधारण अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री पुण्यात येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत.
विजय शिवतारे, तानाजी सावंत (Vijay Shivtare, Tanaji Sawant) या नेत्यांना या दौऱ्यात एक प्रकारे मुख्यमंत्र्यांकडून बळ मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल. गेल्या काही दिवसांमध्ये निष्ठा यात्रेच्या निमित्ताने किंवा शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर कडाडून टीका केलेली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच शहरात असल्यावर दोन्ही बाजूंनी काय बोललं जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.