राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 24 तासात माफी मागा, असा अल्टिमेटम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. अब्दुल सत्तार यांनी माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील केला आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तारांना फोन करून माफी मागण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांची सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात सभा आहे. या सभेमध्ये अब्दुल सत्तार माफी मागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये आणि मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलनं करण्यात आले आहेत. अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला आहे.