TOD Marathi

मुंबई: मुंबईतील साकीनाका येथील मन हेलावून टाकणारी घटना घडली, त्यामुळे सर्वत्र सामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक केली असून या बाबत आता हा खटला देखील फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

हा अमानुष प्रकार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याला २१ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेबाबत पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी या प्रकरबाबत लवकरात लवकर तपास करून आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्यात येईल, असे मत व्यक्त केले आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही. ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत, तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल’, असं नगराळे यांनी सांगितले.