टिओडी मराठी, अमरावती, दि. 10 जून 2021 – उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल दिला. आता नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी. नवनीत राणा यांच्याप्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्र पाठवणार आहे. त्यासह पुढेही आपली कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे, असे शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ म्हणालेत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केलंय. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आलीय. उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांनी कॉन्स्टिट्युशन फ्रॉड केल्याचं म्हणत त्यांना २ लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावर मी सुरुवातीपासूनच आक्षेप घेऊन आवाज उठविलाय. यापुढे देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. खोटी प्रमाणपत्रे सादर करून त्यांनी निवडणूक लढवली आहे. मात्र, नवनीत कौर यांचा ढोंगीपणा नुकताच उघड झालाय, असं आनंदराव अडसूळ म्हणाले आहेत.
या दरम्यान, महाराष्ट्रातील अमरावती हा लोकसभेसाठी एससी राखीव मतदारसंघ होता. जात प्रमाणपत्र असल्याशिवाय खासदारकी कायम राहत नाही. त्यामुळे आता त्यांची खासदारकी धोक्यात आलीय.
नवनीत राणा यांच्यानंतर दुसरा क्रमांकावर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ होते. त्यामुळे खासदारकी रद्द झाली तर, अडसूळ यांना खासदारकी मिळण्याचं बोललं जातंय.