TOD Marathi

देशातील तीन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसह (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai) नवी दिल्ली रेल्वे स्टेशन (New Delhi Railway Station) आणि अहमदाबाद रेल्वे स्टेशनचा (Ahmedabad Railway Station) समावेश आहे. या पुनर्विकास प्रस्तावाला भारतीय रेल्वेने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. देशभरात सध्या 200 च्या आसपास रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू आहे. यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांच्या बृहद नियोजन आणि रचनेचे काम सुरू आहे. जवळपास 32 स्थानकांचे काम वेगाने प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.

यामध्येच काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि अहमदाबाद रेल्वे स्टेशन या तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

रेल्वे स्थानकांवर मिळणार ‘या’ सुविधा 

प्रत्येक स्थानकात दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधांच्या जागांसह सर्व प्रकारच्या सुविधा
रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना स्थानकाची इमारत असल्याने शहराच्या दोन्ही बाजू स्थानकांनी जोडलेल्या असतील
फूड कोर्ट, प्रतीक्षा कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक उत्पादनांसाठी जागा
शहरांच्या अंतर्गत भागात असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये सिटी सेंटर
रेल्वे स्थानकांना आरामदायी करण्यासाठी योग्य प्रकारची प्रकाशव्यवस्था, रस्ता शोधण्याचे नकाशे/खुणा, ध्वनिव्यवस्था, लिफ्ट/सरकते जिने/ट्रॅव्हलेटर्स
वाहतूक सुलभ होण्यासाठी पुरेशा पार्किंग व्यवस्थेसह बृहद आराखडा
मेट्रो, बस इत्यादींसारख्या इतर परिवहन सुविधांसोबत एकात्मिकरण
सौर उर्जा, जल संवर्धन/पुनर्चक्रीकरण आणि सुधारित वृक्ष आच्छादनासह हरित इमारत तंत्रज्ञानाचा वापर
दिव्यांग स्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष काळजी घेण्याची व्यवस्था
इंटेलिजन्ट बिल्डिंगच्या संकल्पनेवर ही स्थानके विकसित करण्यात येतील
आगमन आणि प्रस्थान यांची स्वतंत्र विभागणी करणारी व्यवस्था
सीसीटीव्हीसह विविध सुरक्षा सुविधांनी परिपूर्ण अशी रेल्वे स्थानके