टिओडी मराठी, दि. 25 ऑगस्ट 2021 – काल अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मात्र रात्री साडे नऊ नंतर नारायण राणे यांना महाड येथे दाखल करण्यात आले. पोलिसांनी नारायण राणे यांना उशिरा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. यामुळे नारायण राणे यांचा पोलीस स्टेशन मध्ये मुक्काम टळला आहे. मात्र, भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी वेगळी रणनीती आखली आहे.
काल दिवसभर चाललेल्या या नाट्यमय घडामोडी चा पडदा रात्री साडेनऊच्या सुमारास पडला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल न्यायालयाबाहेर जल्लोष केला. नाशिक आणि पुणे पोलिसांनी नारायण राणे यांचा ताबा मागितला नाही, त्यामुळे राणे यांना दिलासा मिळाला.
शिवसेनेने भाजप विरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा आणि केलेली कारवाई लक्षात घेता भाजपने देखील यास चोख प्रतिउत्तर दिले आहे. भाजपने आता व्हिडीओ क्लिप्स तयार ठेवल्या आहेत. भाजप कडून यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या जाणार आहेत. राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार असल्याचे समजत आहे.
तसेच भाजपने मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी भाषणावेळी त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांनी केलेली वक्तव्य याची व्हिडीओ क्लिप तयार करण्यावर अधिक भर दिला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांवर विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी आणि मुख्यमंत्री यांना अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती तयार ठेवल्या आहेत असे यावरून समजत आहे.