TOD Marathi

मुंबई: 

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल, या प्रकरणाचा निर्णय चार पाच वर्ष लांबेल, असे संकेतच शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार भरत गोगावले यांनी दिले आहेत. तसेच शिवसेनेची (Shivsena) धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल, असा दावाही भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गोटातील चिंता वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरणाची (Hearing in Supreme Court) सुनावणी पुढे पुढे गेली आहे. शेवटची सुनावणी ही ४ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर ‘तारीख पे तारीख’ असा प्रकार सुरु आहे. या सगळ्यामुळे शिवसेनेच्या गोटातील बैचेनी अगोदरच वाढली आहे. भरत गोगावले यांच्या वक्तव्याने त्यामध्ये आणखी भर पडणार आहे.

भरत गोगावले यांनी रविवारी एका सभेत बोलताना याबद्दल एक वक्तव्य केले. अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. पण तुम्हाला मी सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, असे भरत गोगावले यांनी म्हटले. राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

 

सर्वोच्च न्यायालय शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवत नाही तोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार हे सुरळीत चालू राहील. शिंदे-फडणवीस यांच्याकडे सत्ता कायम राहिली तर आगामी काळात शिवसेनेची आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आपले वकील कपिल सिब्बल यांच्यामार्फत लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आग्रह धरला जात आहे. या प्रकरणात अनेक घटनात्मक पेच आहेत. त्याचा निवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. आता हे घटनापीठ कधी सुनावणी घेणार आणि काय निकाल देणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.