टिओडी मराठी, भंडारा, दि. 7 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्रासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारं वृत्त आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज दिला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिला जिल्हा ठरला आहे. भंडाऱ्याचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली.
आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झालाय. भंडाऱ्यामध्ये मागील वर्षी 27 एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे. तसेच शुक्रवारी 578 जणांचे सँपल तपासले आहेत. त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नाही, असे आढळून आलं आहे, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले आहे.
यंदा 12 जुलै रोजी जिल्ह्यामध्य सर्वाधिक 1596 रुग्ण आढळले होते. तर 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात 12, 847 रुग्ण सक्रिय होते. तर 12 जुलै 2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला होता. तर यंदा 1 मे रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या 35 झाली होती.
आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 1133 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालाय. जिल्हाधिकारी कदम यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलंय. त्यानुसार, 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात 12,847 सक्रिय रुग्ण होते. मात्र, त्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. 22 एप्रिल रोजी सर्वाधिक 1568 रुग्णांना डिस्चार्ज दिला होता.
जिल्ह्यामध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. 19 एप्रिल रोजी जिल्ह्यातील रिकव्हरी रेट घटून 62.58 टक्के होता.
आता हाच रिकव्हरी रेट वाढून 98.11 टक्के इतका झाला आहे. तर 12 एप्रिल रोजी पॉझिटीव्हिटी रेट सर्वाधिक 55. 73 टक्के होता. तो आता घटून शून्य झालाय.