TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 19 ऑगस्ट 2021 – अनैतिक कृत्ये आणि गैरव्यवहारांप्रकरणी ‘गोरखधंदा’ हा शब्द वापरला जातो. मात्र, आता हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारने या शब्दाच्या वापरावर बंदी घातलीय. ‘गोरखधंदा’ या शब्दामुळे एका समाजाच्या भावना दुखवल्या जाताहेत. यामुळे या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश सरकारने दिलेत. या शब्दामुळे संत गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जाताहेत. त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले आहे.

बुधवारी गोरखनाथ समाजाच्या एका प्रतिनिधी मंडळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या वापराने अनेकांची मनं दुखावली जात आहेत. यामुळे हरियाणामध्ये या शब्दावर बंदी घालावी, अशी मागणी समाजाच्या प्रतिनिधींनी केली. या शब्दाच्या नकारात्मक अर्थामुळे गोरखनाथ यांच्या अनुयायींच्या भावना दुखावल्या जात आहेत, असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

गुरू गोरखनाथ हे महान संत होते, यामुळे कुठल्याही भाषेत, भाषणात किंवा इतर कुठल्या संदर्भात हा शब्द वापरण्याने त्यांच्या अनुयायांचे भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे कुठल्याही संदर्भात या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे, असे खट्टर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सरकारकडून याबाबत लवकरच एक अधिसूचना जारी केली जाणार आहे.