TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 16 ऑगस्ट 2021 – सर्वोच्च न्यायालयासमोर एक महिला आणि एका पुरुषाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. भगवान दास रोडवरील गेट नंबर डी समोर एक महिला आणि एका पुरुषाने स्वतःला आग लावून घेतले. यात जखमी दोघांनाही राम मनोहर लोहिया रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसरामधये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मात्र, आत्मदहन करणाऱ्यांनी हे पाऊल का उचललं? हे अदयाप समजलेलं नाही.

न्यायालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघांना आत्मदहन करताना पाहिले. त्यानंतर पोलीस लगेच आग विझवण्यासाठी ब्लॅंकेट घेऊन धावले. दोघांना तातडीने पोलीस व्हॅनमध्ये राम मनोहर लोहिया रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी सांगितलं आहे.

जखमी दोघंही गेट नंबर डीमधून न्यायालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्याजवळ ओळखपत्र नसल्याने त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवलं होतं. तेवढ्यात त्या दोघांनी स्वतःला आग लावून घेतली. हे दोघं न्यायालय परिसरात आले तेव्हा त्यांच्या हातात एक बाटली होती, अशी माहिती मिळली आहे.

या बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पोलीस याचा तपास करत असून या दोघांनी न्यायालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न का केला?, हे अदयाप समजलेलं नाही.