चंद्रपूर : करोनामुळे मागील दोन वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे आगामी पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घ्यावे, अशी मागणी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत बोलताना केली होती. (Ajit Pawar on demand of MLA Kishor Jorgewar) या मागणीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समर्थन करत नव्या सरकारने याकडे लक्ष देऊन पावसाळी व हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे, असे म्हटले आहे.
नागपूर करारानुसार दरवर्षी राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेतले जाते. (Session in Nagpur) परंतु करोनामुळे २०२० चे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात आले नाही. पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, ते अधिवेशनही मुंबईतच घेण्यात आले. विदर्भातील कामगारांचे प्रश्न, उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, रस्त्यांची दुरवस्था, अवकाळी पावसाने झालेली पिकांचे नुकसान, सिंचन, पर्यटन, उद्योग गुंतवणूक, सर्वांगीण विकास, विदर्भातील असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा अनुशेष सर्वाधिक आहे आणि तो भरून काढणे आवश्यक आहे. त्यामुळे विदर्भातील जनता दरवर्षी नागपूर अधिवेशनाची आतुरतेने वाट बघत असते.
हे सगळ लक्षात घेता पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे, अशी मागणी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. आणि या मागणीचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी समर्थन केले आहे. सरकारमध्ये आल्यानंतर पहिले अधिवेशन झाले आणि त्यांनंतर मार्च महिन्यात करोना आला. त्यामुळे नागपुरात अधिवेशन झालेच नाही. जोरगेवार यांनी नागपूरला दरवर्षी अधिवेशन झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असेही विरोधी पक्षनेते पवार यांनी म्हटले आहे.