TOD Marathi

देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहू येथील मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून अजित पवार यांचे भाषण अपेक्षित होतं, मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांचे भाषण झाल्यानंतर निवेदकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांना भाषणासाठी निमंत्रित केलं. त्यानंतर मोदींनी अजितदादांकडे हात करत त्यांना बोलू द्या म्हटलं. मात्र अजित पवार यांचं भाषण झालं नाही.

यावर आता आक्षेप घेतला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्र राज्याचा हवामान असल्याचे म्हटले आहे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील या मुद्द्यावरून टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाचं वेळापत्रकच सोशल मीडियावर शेअर करत त्या ठिकाणी नियोजित स्वरूपातच अजित पवारांचे भाषण नव्हतं हे सांगितलं आहे.

नाना पटोलेंची भाजपवर टिका : 
राज्याचे उपमुख्यमंत्त्री अजित पवार यांना बोलण्याची संधी न देता भाजपाने तुकोबांच्या दरबारातही गलिच्छ राजकारण केले. अजितदादा हे उपमुख्यमंत्री असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे कार्यक्रमात त्यांचे बोलणे महत्वाचे होते परंतु देवाच्या दारी जाऊनही भाजपाला राजकारण सुटत नाही ही शरमेची बाब आहे. ‘मनी नाही भाव अन् देवा मला पाव’ असं कधी होत नाही हे भाजपाने लक्षात ठेवावं ! अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी यावर दिली आहे.