TOD Marathi

राज्यसभा निवडणुकीसाठीचं (Rajyasabha Election) मतदान सुरू असून महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा जागांसाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एरवी बिनविरोध होणारी राज्यसभेची निवडणूक यंदा मतदानातून होत असल्यानं सर्वाचं या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. एक – एक मत प्रत्येक पक्षासाठी महत्वाचं झालं आहे. तसंच आपण केलेलं मतदान अवैध ठरणार नाही आणि पक्षावर नामुष्की ओढवणार नाही याचीही काळजी सर्व आमदारांनी घेतली आहे. या निवडणुकीबाबतचे विशेष प्रशिक्षणही प्रत्येक पक्षानं आपल्या आमदारांसाठी ठेवलं होतं.

आज मतदान करताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं मतं मात्र बाद होता होता राहीलं. वेळीच हा घोळ लक्षात आला आणि आदित्य ठाकरेंना मतदान करता आलं.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आदित्य ठाकरे विधानभवनात पोहोचले. ते जेव्हा आपलं मत नोंदवणार होते त्याचवेळी त्यांना देण्यात आलेल्या मतपत्रिकेवच चक्क निवडणूक आयोगाचा शिक्काच नाही असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीनं या गोष्टीची दखल घेत संबंधित मतपत्रिका बाजूला ठेवून आदित्य ठाकरे यांना निवडणूक आयोगाचा शिक्का असलेली मतपत्रिका देण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपलं मत नोंदवलं.

आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाचा शिक्का नसलेल्या मतपत्रिकेवर आपलं मत नोंदवलं असतं तर मतमोजणीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्काच नसल्यामुळे मत बाद ठरविण्यात आलं असतं. त्यामुळे शिवसेनेचं (Shivsena) एक मत अवैध ठरलं असतं आणि मोठी नामुष्की पक्षावर ओढावली असती. आता इतक्या चुरशीच्या लढाईत निवडणूक मतपत्रिकेवर आयोगाचा शिक्काच नसणं असा घोळ नेमका झाला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच निवडणूक आयोगाचा शिक्का नसलेली मतपत्रिका तिथं कुणी ठेवली? याची निवडणूक अधिकाऱ्यांकडून (Election Officer) चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.