मुंबई :
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Monsoon session of Maharashtra state assembly) सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही, असं उत्तर बुधवारी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिलं होतं. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी तीव्र आक्षेप घेत योग्य ती आकडेवारी द्यावी, दिशाभूल करू नये, अशी मागणी केली होती. त्यानंतर आजही कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही या दाव्यावर गावित ठाम राहिले. आदिवासी विकास मंत्र्यांच्या याच उत्तराने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेना आमदार आदित्य ठाकरेही संतापले आणि या संतापाच्या भरात आदित्य यांनी वापरलेल्या एका वाक्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला.
‘सुधीरभाऊंची भाषणं ऐकून मी प्रेरित झालेलो आहे, मी एवढंच म्हणालो की स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी ही परिस्थिती आहे, त्यात मला सरकारचा दोष द्यायचा नाही, पण नेते म्हणून ती आपल्याला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, यात मी काय चूक बोललो नाही, मी कुणाकडे बोट दाखवलं नाही, आपण फक्त नेते म्हणून काम करायला हवं,’ असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.