TOD Marathi

चंद्रपूर: 

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात लाकडं जळाली आहेत. बल्लारपूर-कळमना मार्गावरील हा डेपो २० एकरात पसरला होता. त्यात एकूण १५ हजार टन लाकूड साठवून ठेवले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या १५ हजार टन लाकडाचा कोळसा झाला आहे. यात बांबू, निलगिरी आणि सुबाभूळ यांचा समावेश आहे. यालगत असलेला पेट्रोल पंपही आगीच्या भक्ष्यस्थानी आला.

हा पंप गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल नसल्याने बंद होता. त्यामुळे पेट्रोल जळाले नसले तरी पंपाचे मोठे नुकसान झाले. ही आग विझवण्यासाठी अजूनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्हाभरातून आणि बाजूच्या गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातून १५ पेक्षा अधिक बंब कार्यरत आहेत.

चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील आग आणखी भडकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बल्लारपूर-आष्टी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. अग्निशमन दलाच्या बंबांचे आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. या आगीच्या स्थळाच्या अगदी शेजारी एक पेट्रोल पंप आहे. आग पेट्रोल पंपापर्यंत आग पोहचू नये यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ महसुली व पालिका अधिकाऱ्यांसह पेपर मिलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.