गोंदिया:
वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहिलाही होत असताना फक्त माणूसच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. पक्ष्यांच्या जीवनमानावर याचे गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. गोंदिया जिल्ह्यात वनविकास महामंडळाच्या जांभळी वनक्षेत्रात तब्बल १६ पक्षी मृतावस्थेत आढळले. हे सर्व पक्षी नैसर्गिक पाणवठ्याजवळ आढळल्याने उष्माघात की विषबाधा असाही संशय निर्माण झाला आहे.
सारस संवर्धनासाठी काम करणारी ‘सेवा’ या संस्थेची चमू प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करत असताना १२ ट्री पाई, एक शिकरा, एक युरेशियन स्पॅरो हॉक, एक व्हाइट थ्रोटेड किंगफिशर, एक सामान्य मैना हे पक्षी अर्धवट कोरड्या नैसर्गिक पाणवठ्याजवळ मृतावस्थेत आढळले. या सर्व मृत पक्ष्यांचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, ते कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्या नमुन्याचा अभ्यास होऊ शकला नाही. प्राथमिक निरीक्षणात मृत्यूचे कारण विषबाधा किंवा उष्माघात असू शकते, असे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर म्हणाले.