जेजुरी : अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भाजप नेते गोपीचंद पडळकर आज जेजुरीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर तिखट शब्दात टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार यांनीच होळकरांच्या जमिनी ढापल्याचं पडळकरांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या आणि शेकडो हिंदूंचा खून करणारे आज सत्तेत बसले आहेत. त्या भ्रष्टाचारी आणि जातीयवादी लोकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते.
त्या जातीयवादी लोकांचे हात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला लागले होते. त्यामुळे आज आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्याचे शुद्धीकरण करणार असल्याचं पडळकरांनी यावेळेस सांगितलं.
तसेच खेड तालुक्यातील वाफगावचा किल्ला आम्ही अनेक वर्षापासून मागत आहोत. मात्र, शरद पवार हे फुकट हा किल्ला वापरत आहेत,होळकरांच्या जमिनी त्यांनी ढापल्या ,काठेवाडी येथील जमिनीचे मिळालेले पैसे होळकरांच्या कुटुंबाला मिळाले नसून हे पैसे सुद्धा ढापले असून होळकरांच्या जमिनीवर यांचाच डोळा असल्याचे आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.