मुंबई: आर्यन खानच्या जामीनावर आजही निर्णय झाला नसून आजची रात्रही त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. आता त्याच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. आता जामीन मिळणार की आर्यनची दिवाळी तुरुंगातच जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या 21 दिवसांपासून आर्यन खान तुरुंगात आहे.
आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला. तो शाहरुख खानचा मुलगा असल्याने हा मुद्दा ताणून धरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी झाली आहे.