पालघर: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार तसेच भाजपचा कार्यकर्ता असलेला किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याच उघडकीस आलं होतं. आता पालघर जिल्ह्यातील दोघांची परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय.
पालघरच्या दोन तरुणांनी किरण गोसावीविरोधात तक्रार दिली आहे. आर्यन खान प्रकरणामधील एनसीबीने ज्याला पंच केलाय, तोच पंच किरण गोसावी फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप पालघरमधील पीडित तरुणांनी केला आहे.
किरण गोसावी याने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात कामाला लावतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांची ही त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. उत्कर्ष तरे व आदर्श किनी या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.