सातारा: साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे.
अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्रकुमार घाडगे याच्या मालकीचा हा कारखाना आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ही कारवाई केली असल्याची माहिती जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा व माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी दिली होती.