मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी लावलेल्या आरोपा नंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर चांगलीच टीका केली आहे. मंत्र्यांवर धादांत खोटे आरोप करणं, मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत आहे. किरीट सोमय्या जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. मुश्रीफ या घोटाळ्यात सहभागी असतील असं मला वाटत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
कुणीही आरोप केले तर त्याची चौकशी होतेच, चौकशी अडवू नये. सांगली मध्यवर्ती बँकेच्या चौकशीत काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही. जनसामान्य माणसात त्यांची प्रतिमा चांगली राहते, असंही यावेळी पाटील म्हणाले आहेत.