टिओडी मराठी, नांदेड, 1 सप्टेंबर 2021 – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आखत्यारीतील साखर कारखान्याला एका कंपनीने सुमारे 6 कोटी रुपयांला फसवले आहे. नांदेडमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट 3 आणि 4 ने साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडूतील चेन्नई येथील एका कंपनीला दिले होते. या कंपनीने साखर कारखान्याची फसवणूक केलीय.
साखर निर्यातीवर केंद्राकडून काही रक्कम कारखान्याला मिळते. पण, निर्यातीचे कागदपत्रे मागितली असता कंपनीने कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. इंडोनेशियाने साखर स्वीकारण्यास नकार दिल्याचे उत्तर कंपनीने दिले. कंपनीने दिलेले चेक्सही बाऊन्स झालेत. त्यामुळे कारखान्याची सुमारे 5 कोटी 93 लाख 65 हजार 536 रुपयांची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात चेन्नई येथील कुरुंजी प्रो नॅचरल फूड्स वलसरावक्कम चेन्नईचा चेअरमन इडिगा मनिकांता, प्रतिनिधी अभिजीत देशमुख आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली असून अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.