टिओडी मराठी, दि. 23 ऑगस्ट 2021 – देशातील श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती येथील मंदिरामध्ये आता प्लॅस्टिक बंदी केली आहे. भाविकांना प्रसादाचे लाडू डीआरडीओने तयार केलेल्या खास प्रकारच्या बॅगमधून दिले जाणार आहेत. या पिशव्या बायोडीग्रेडेबल मटेरियल पासून बनविल्या गेल्या आहेत. त्या पर्वावरणपूरक आहेत.
याबाबत डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी म्हणाले, डीआरडीओ हैद्राबाद’च्या आधुनिक सिस्टीम प्रयोगशाळेत धोकादायक प्लॅस्टिकला सर्वोत्तम पर्याय शोधला आहे. दीर्घ संशोधन त्यासाठी केले आहे.
एकवेळा वापर होणाऱ्या प्लॅस्टिक बॅग पर्यावरणाला धोका निर्माण करतात. त्याला पर्याय म्हणून या बॅग मक्याच्या स्टार्च पासून बनविल्या आहेत. या पिशव्या ९० दिवसानंतर आपोआप नष्ट होत असतात. जनावरांच्या पोटामध्ये त्या गेल्या तरी त्यापासून कोणताही अपाय होत नाही.
तिरुमला हे देश विदेशातील प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दररोज लाखोंच्या संखेने भाविक येतात. त्यांना या पिशव्यातून प्रसाद दिला जाणार आहे. नेहमीच्या वापरातल्या प्लॅस्टिक पिशव्या डीकंपोज व्हायला २०० वर्षापेक्षा अधिक काळ लागतो. त्यामुळे पर्यावरणासाठी त्या धोका ठरत आहेत.
तिरुपती देवस्थान कार्यकारी अधिकारी, डीआरडीओ अध्यक्ष सतीश रेड्डी, डॉ. के जवाहर रेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये मंदिरात रविवारी या नव्या पिशव्यांच्या विक्रीसाठी विशेष कौंटर उघडले आहे.