टिओडी मराठी, दि. 16 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली असून इथल्या नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. विमानतळावर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झालीय, असे असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानी सत्तेचं स्वागत केलंय.
गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करतो, तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणं सोपं नाही. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे. ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखं आहे, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलंय.
तर दुसरीकडे, तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास चीन तयार आहे, असे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो. अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.
दरम्यान, सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला आहे. ते ताजिकिस्तानला रवाना झाले होते. मात्र, त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अशरफ घनी आता अमेरिकेमध्ये जाऊ इच्छित आहेत. अशा परिस्थितीत अशरफ घनी सध्या ओमानमध्ये आहेत, असे समजते.
अफगाणिस्तानामध्ये तालिबानचं राज्य प्रस्थापित झाल्याने अमेरिका, ब्रिटेन, उत्तर कोरिया, ऑस्ट्रेलियासहित अनेक देशांनी आपली दूतावास बंद केलं आहेत. अमेरिकेने ९/११ हल्ल्यासाठी अल कायदाला जबाबदार धरून अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता.
अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने तालिबानला बाहेर केलं. त्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी अफगान सुरक्षा दल आणि पोलिसांना प्रशिक्षण दिलंय. अमेरिकेने मागील २० वर्षातील युद्धामध्ये २० खरब डॉलर खर्च केले आहेत. तर, २,३१२ सैनिक शहीद झालेत.