टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्याचे माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नोकर भरतीबाबतची मोठी घोषणा केलीय. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पद भरतीच्या निर्बंधामधून सूट दिली आहे. त्यामुळे गट ‘अ’ ते ‘क’ पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करणार आहे, अशी घोषणा दत्तात्रय भरणे यांनी केलीय.
‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा व रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट दिली आहे.
तसेच गट ‘अ’ ची 4 हजरा 417 पदे, गट ‘ब’ ची 8 हजार 31 पदे आणि गट ‘क’ ची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
एमपीएससीच्या सदस्यांची देखील पदे भरणार :
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश दिले आहेत.
याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा केली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील, असे त्यांनी सांगितलं आहे.
वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश
संघ लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.