टिओडी मराठी, पुणे, दि. 7 जुलै 2021 – भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) भोसरी जमीन घोटाळा बाहेर काढून धक्का दिला आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केलीय. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यामुळे आमच्या मागे ईडी लावली जात आहे, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. आणि जर त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लावू, असंही त्यांनी गंमतीत पक्ष बदलताना म्हंटलं होतं.
पुण्यातील भोसरी इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी केली होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
गिरीश चौधरी मंगळवारी ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी केली होती.
याअगोदर ईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. माजी भाजप नेते असणारे एकनाथ खडसे यांना ईडीने डिसेंबर महिन्यात चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावलं होतं.
यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. आपण भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.
ईडीने यावेळी एकनाथ खडसे अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालानुसार आरोपी नाहीत. मात्र, जर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर अटक केली जाईल, हेही स्पष्ट केलं होतं. २०१८ मध्ये २२ पानांच्या रिपोर्टमध्ये एसीबीने एकनाथ खडसेंनी क्लीन चीट दिली होती.
एकनाथ खडसे याअगोदर राज्याचे महसूल मंत्री होते. जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती दिनकर जोतिंग यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला आहे.
जाणून घ्या, भोसरी जमीन घोटाळा प्रकरण :
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून सुमारे ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली.
नोंदणी निबंधकांच्या कार्यालयामध्ये या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशाप्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले.
एकनाथ खडसे यांचं म्हणणं असं आहे :
एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार ‘‘मूळ जमीन मालकाने संपादित जमिनीचा मोबदला आधी पावतीने घेतला नसल्याने आणि भूसंपादन प्रक्रिया व्यपगत झाल्याने तोच आज देखील जमीनमालक आहे. आणि तो ‘ती’ जमीन कुणालाही विकू शकतो. म्हणून आपणही त्याच्याकडून अशी जमीन घेऊ शकतो. त्यात बेकायदेशीर काही नाही.
जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लावला आहे. मात्र, भाजपाने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता.
मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की, तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर, त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण, आता सांगतो. जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असं म्हणालो होतो.
NCP leader Eknath Khadse's son-in-law was arrested in the Pune land deal case yesterday. He was called for questioning and later placed under arrest: Enforcement Directorate
— ANI (@ANI) July 7, 2021