टिओडी मराठी, दि. 2 जून 2021 – जर पती त्रास देत असल्यास पत्नीला घरगुती हिंसाचार कायद्याखाली पतीविरुद्ध तक्रार करता येते. पण, जर पत्नीकडून त्रास दिला जात असेल तर पतीने काय करावे?, (घरगुती हिंसाचारसाठी) पतीसाठी असा कायदाच नाही. याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलीय.
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी अपील केले होते. हे अपील कौटुंबिक न्यायालयाने मान्य देखील केले. मात्र, घटस्फोटाला मंजुरी मिळविण्याच्या चार दिवस अगोदर पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली पतीविरुद्ध तक्रार दाखल दिली. त्यामुळे पतीची नोकरी देखील गेली. याविरुद्ध त्याने मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली.
या सुनावणीवेळी न्यायमूर्ती एस. विद्यानाथन यांनी चिंता व्यक्त करताना वरील स्पष्ट मत मांडले. तसेच त्या व्यक्तीला नोकरीवर परत घेण्याचे आदेश संबंधित व्यवस्थापनाला दिले आहेत.
या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने काय म्हटले ?
महिला घरगुती हिंसाचार कायद्याखाली पुरुषाविरुद्ध तक्रार दाखल करू शकते, त्यांना अधिकार आहे. मात्र, जर महिलेकडून पुरुषाचा छळ झाला तर पुरुष/पती (घरगुती हिंसाचार) या कायद्याखाली तक्रार दाखल करू शकत नाही, कारण पुरुषांसाठी असा कायदाच नाही.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत मान्यता दिल्यानंतर अशा प्रकरणांत अधिक वाढ झाली आहे. सध्याच्या पिढीने लक्षात ठेवायला हवे की, विवाह म्हणजे कॉण्ट्रक्ट नाही, तर ते एक पवित्र संस्कार आहे. पती-पत्नीने अहंकार, आपले मतभेद बाहेर ठेवून घरात प्रवेश केला पाहिजे; अन्यथा मुलांच्या आयुष्यावर याचा खूप मोठा परिणाम होतो.